Sunday, February 26, 2012

हम उस देश के वासी है....
मागच्या रविवारी खूप दिवसांनी मी रिक्कामा होतो. नेमका मला आवडलेला राज कपूरचा 'जिस देश में गंगा बहती है' (परत एकदा - कितव्यांदा आठवत नाही...) पाहण्याची संधी घेतली. मात्र यावेळी शांतपणे आपल्या घरात, एच डी टी व्ही वर. अर्थात, त्यामुळे अत्यंत महत्वाच्या आणि भावुक प्रसंगांच्या वेळी 'सुजाण' प्रेक्षकांकडून येणाऱ्या अचकट विचकट कॉमेंट्स नव्हत्या... सिनेमागृहातील विशिष्ट बिड्या, सिगारेट्स (आणि अजूनही काही पदार्थांचे) वास नव्हते... ऐन चांगले गाणे चालू असताना ('सुजाण' रसिकांचे) येरझारे नव्हते...  अगदी एरवी आवडणारा... पण ऐनवेळी, नको त्यावेळी नको ती बकबक करणारा मित्रसुद्धा नव्हता... आणि मुख्य म्हणजे 'फिल्म कटण्याचा' त्रास नव्हता.. थोडक्यात रसभंग करणारे कोणतेही शत्रू नसताना, अजूनच लक्षपूर्वक पाहता आला ... हवे त्या प्रसंगी भावुक होवून, न लपवता अश्रूही ढाळता आले.... खरं म्हणजे अनेक वेळा ...  पाहिलेलाच सिनेमा... प्रसंगच काय, संवादही पाठ झालेले असताना पुन्हा पुन्हा या चित्रपटावर जीव का टाकला जातो.... ? अजूनही विशिष्ट प्रसंगात डोळे ओले का होतात ...? ही कशाची जादू ..? .. की आपलीच अतिभावुकता ..? .. की एक वेगळ्या प्रकारची अंधश्रद्धा...? ... काही असो... परत एकदा हा सिनेमा नव्याने आवडला... अगदी पहिल्यांदा आवडला होता  तितकाच... किंबहुना त्याहून जास्तच... अर्थात वर उल्लेखलेले 'शत्रुघटक' नव्हते म्हणून केवळ नव्हे... ते होते तेव्हाही या किंवा तत्सम कोणत्याही सिनेमावर ... किंवा व्यक्ती व वस्तूवरही ...  एका विशिष्ट वयात नादानपणे प्रेम केलंच होतं ....  
... पण आज अजून एक परिस्थिती हा सिनेमा आज एवढा आवडावा त्याला कारणीभूत होती.... ती म्हणजे अशा प्रकारच्या भावुकतेची वरचेवर भासणारी आणि धास्तावणारी उणीव... अंतर्मुख होवून व चिंतनात्मक पद्धतीने घेतलेला एखाद्या अनुभवाचा दुर्मिळ होत चाललेला आस्वाद... त्याऐवजी बोकाळत चाललेले जातीपातीपासून अनेक प्रकारच्या पूर्वग्रहापर्यंतचे सशक्त होत चाललेले सामाजिक रिपू... आणि असुरक्षित करणारी संभ्रमावस्था... चूक - बरोबर, योग्य - अयोग्य, नैतिक - अनैतिक, साहजिक - अस्वाभाविक,  नैसर्गिक - कृत्रिम..... अशा सर्व विशेषणांनी युक्त होत चाललेल्या अनुभूतींची वाढत जाणारी जंत्री... आणि त्यात हरवलेला माणुसकीचा मूलार्क... या परिस्थितीत आशेचा किरण म्हणून आणि जगण्याची प्रेरणा देणारा अनुभव ... म्हणजे अशा चित्रपटांचा (अशा पद्धतीने) घेतलेला आस्वाद ... असा चित्रपट पाहून असं वाटतं की असं घडू शकतं ..! असं असू शकतं...! असा एखादा माणूस असू शकतो... जो दरोडेखोरांनाही माणूसच मानतो... आणि पोलिसांनाही ... एवढ्या पराकोटीच्या विरुद्ध बाजूंच्या ठायी असलेली माणुसकीच फक्त बघणारा आणि तिच्यावर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करणारा... जीवनाला जीवनाच्या हतबलतेसह, दौर्बल्यासह, क्रौर्यासह, वैचित्र्यासह आणि कारुण्यासह  स्वीकारूनही प्रसंगी  नाकारणारा.... आसक्त असूनही त्यागण्याची तयारी असणारा...  ! ... आणि तरीही माणूस म्हणूनच उरणारा.... जगणारा... मरणारा.... ... असा माणसाचा साक्षात्कार घडवणारी कलाकृती साकारणारा...
... डाकू असो की सज्जन ... ! सगळ्यांनीच या पृथ्वीवर प्रेम करत हक्काने आणि जबाबदारीने जगावे.... मुळात... डाकू असा कोणी नसतोच ... नसावाच... जो कोणी असतो तो माणूसच आणि जीवनाच्या शोधात हतबलतेने, अगतिकपणे ओढला, फरपटलेला, ... अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणाराही... अजाण  माणूसच ... त्याला त्याचा शोध देण्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा देणारी अशी कलाकृतीही देणारा माणूसच...
... 'तो'ही हक्काने जगला पाहिजे आणि 'हा'ही ...! ..  पण असे म्हणताना, व्यावहारिक सामाजिक जीवनाचा मेळ जातो... घोळ होतो. चोरही जगला पाहिजे आणि पोलीसही ... (सॉरी,)  सज्जनही ... ! असं कसं म्हणता येईल... ? कुणाला तरी मारला पाहिजे ... 'हा' मेल्याशिवाय 'तो' किंवा 'तो' मेल्याशिवाय 'हा' जगणार कसा ..? 
... असे प्रश्न सोडवणारा सिद्धांत हा चित्रपट देवून जातो... दोघांनाही माणूस समजल्याशिवाय हा प्रश्न सोडवता येणार नाही, हा इशाराही देवून जातो आणि त्यावरचे पर्याय आणि तोडगेही सांगतो... ‘नैन बिछाये,.. बाहें पसारे,... तुझको पुकारे, देश तेरा...’ असं आसमंत दुमदुमून जाईपर्यंत आर्त आवाहन व मार्गदर्शन करतो.... आणि तरीही (कुणी कितीही आरोप केले, तरीही) निव्वळ स्वप्नाळूपणे हा विचार केवळ बोलघेवडेपणाने न सांगत राहता (चित्रपटातील 'राका' या पात्रासारखी ) काही निर्ढावलेलीही मंडळी असतात, याची जाणीव ठेवणारी वृत्ती ही भोळसट नसून अधिक समजूतदार आणि अभ्यासू वाटते.  ... आणि तरीही त्यांच्याही डोळ्यात अश्रू असतात, ही जाणीव देणारी कलाकृती दाखवते.  ते तिच्या श्रेष्ठत्वाचे द्योतक ठरते...

जीवन प्रवाही असते... पण ते विविधरंगीही असते... समर्थ, तसेच दुर्बळही असते... आपण त्याकडे विशिष्ट नजरेने पाहतो... ती विशिष्टता त्याला वेगळे करते... कुणाला दरोडेखोर करते... कुणाला पोलीस (सॉरी, सज्जन) करते... फरक एवढाच की, कुणी ते लपवतो, कुणी लपवत नाही... कधी ते योग्यही असते; कधी अयोग्यही... मात्र.. जगण्याचा अधिकार सर्वांनाच असतो... कधी धिक्कार तर कधी पुरस्कार करत सर्वांचे जगणे, असे जो समजून घेतो.... तो राज कपूर आणि त्याने उभ्या केलेल्या 'राजू' ह्या वरकरणी भोळसट वाटणाऱ्या पात्राची निरागसता... राजकपूरच्या प्रत्येक चित्रपटात ('आग', 'आह', 'आवारा' पासून  ते अगदी ‘मेरा नाम जोकर’, 'सत्यम शिवम..', प्रेमरोग' आणि 'हीना' पर्यंतही .. हीच निरागसता जगताना पाहायला मिळते... त्याचं संगीतरसिकत्व,  सौंदर्यदृष्टी, परिपूर्णतेचा एकेका दृश्यातून दिसणारा कमालीचा आग्रह, अभिनय, विशेष म्हणजे स्त्रीसौंदर्याच्या त्याच्या दृश्य कल्पना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आविष्कृत करतानाची त्याची सर्जनशीलता, प्रतिकात्मक दिग्दर्शनकुशलता  या सगळ्यांचा परिपाकही त्या निरागसतेचीच फलश्रुती... ही त्याची निरागसताच त्याला सर्वमान्यता देते.
... सामान्य जगात तीच विरळ होत चालल्याची भावना आणि अनुभूती... हा चित्रपट अजूनही पहायला लावते ... प्रेम करायला लावते.... हम उस देश के वासी है.... (जहाँ आँखो में गंगा बहती है...'   (.. मात्र, त्यासाठीही 'कृष्ण-धवल' चित्रपट ...आणि राजकपूरही... यांच्याबद्दलचा अनाठायी पूर्वग्रह बाजूला ठेवला तर... )

                         - प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, 
                           द्वारा - वृषाली कुलकर्णी,
१४, प्लॕटिनम अपार्टमेंट्स, 
देसाईनगर, आदित्य आंगणजवळ,         नांदेड- सोलापूर रिंगरोड, लातूर ४१३ ५१२ 
भ्रमणध्वनी : ८३२९० ३२१६४ / 
                   ७५८८० ६२५४६ 
ई मेल : drsantoshkulkarni32@gmail.com

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home